Saturday, March 29, 2025

असा प्लॅन करा गुढी पाडवा मेन्यू

                   असा प्लॅन करा "गुढी पाडवा" स्पेशल मेन्यू 


चैत्र महिन्याची चाहूल घेऊन गुढी पाडवा सण येतो. नवीन वर्ष सुरू होते. वसंत ऋतु, ग्रीष्म ऋतु ला बोलावणं धाडून लवकरच निरोप घेणार असतो.अशा वेळी भूक मंदावते , मनावर , निसर्गात एक मळभ आल्यासारखं होतं हे मळभ घालवण्यासाठी च सणवार साजरे करायचे असतात. 

               गुढी पाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत आखला जातो. शरीरात आलेली रुक्षता घालण्यासाठी, तोंडाला चव यावी , मनाचे शरीराचे तर्पण म्हणजे तरतरी यावी यासाठीच हे  पदार्थ परंपरांनुसार चालत आलेले असतात. श्रीखंड हे अशाच गुणांचे आहे. योग्य पद्धतीने तयार केल्यास ते अपथ्यकर म्हणजे शरीराला बाधत नाही. चला आपण बघूया काय काय काळजी घ्यावी. श्रीखंडा च्या रेसिपी साठी पूर्वी आलेला "रसाला" हा ब्लॉग बघू शकता. 

श्रीखंड :

श्रीखंड तयार करताना शक्यतो ताजे दही बांधून घरी चक्का तयार करावा. यामुळे तो फार आंबट होत नाही. व पित्तकर होत नाही. साखर आवडीप्रमाणे घालून ते व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. यामध्ये विलायची पूड १/२ टीस्पून , मिरे पूड १/४ टीस्पून, जायफळ१/४ टीस्पून, मध १ टीस्पून, केशर ६-७ काड्या ( प्रमाण साधारण ४ माणसांकरिता) याप्रमाणे मसाले घालावेत यामुळे रंग, चव, गंध फार छान येतोच शिवाय पचायलादेखील मदत होते. जेवणानंतर जो शरीरात जडपणा वाटतो तो येत नाही. आवडत असल्यास ड्राय फ्रुट्स घालण्यास हरकत नाही.

विकतचा चक्का आणायचा असल्यास फार आंबट नाही ना हे बघून घ्यावे. 

श्रीखंडामध्ये फळे घालता येतात जसे आंबा, द्राक्षे, खरबूज, डाळिंब केवळ एका वेळी एकच फळ घालावे. अनेक फळे घालू नयेत.

पुरी : 

पुरी साठी कणिक भिजवताना त्यामध्ये ओवा जरूर घालावा. चव छान येते, आणि पुऱ्या पचायला सुलभ होतात. पुऱ्या तळताना गायीच्या तुपात तळाव्यात. या पुऱ्या श्रीखंडा सोबत छान लागतात आणि पित्त वाढत नाही.

भाजी :

भाजी ठरवताना फळ भाजी चा विचार प्राधान्याने करावा जसे भोपळा, पडवळ, लाल भोपळा, दोडके,इ.  किंवा फ्लॉवर, कोबी या भाज्या.बऱ्याचदा पुरीसोबत बटाट्याची भाजी आवडते तर ती तेलावर म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या म्हणतो तशी करावी आणि अगदीच आवडत असेल , तरूण वय,ज्यांची पचनशक्ती चांगली असेल वाताचा त्रास नसेल तर उकडलेल्या बटाट्याची खाण्यास हरकत नाही. शेवटी मन तृप्त होणे अधिक महत्वाचे. 

वरण-भात :

मुगाचे वरण आणि पेज काढून केलेला भात त्यावर गायीचे तूप आणि लिंबाची फोड

कडुलिंब गोळी किंवा चाटण :

कडुलिंबाची कोवळी पाने, फुले , जिरे, चिंच, गूळ याचे घरोघरी जी गोळी किंवा मिश्रण /चाटण केले जाते ते जरूर खावे. यामुळे रक्तदुष्टी दूर होते, पाचक होते रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

चटणी व कोशिंबिरी :

बऱ्याच ठिकाणी आंब्याची डाळ करण्याची पद्धत आहे. ती जरूर करावी किंवा आवळ्याची चटणी किंवा कैरीची चटणी. खोबऱ्याची चटणी. 

काकडीची दही न घालता केलेली कोशिंबीर किंवा बीट वाफवून कोशिंबीर

कोशिंबीर करताना जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग याची फोडणी जरूर घालावी

चटण्या व कोशिंबिरी या भाजीप्रमाणे खाऊ नयेत


तळण :

तळण शक्यतो नको केल्यास मूगाची भजी किंवा एखादा पापड यापैकी एकच असावे. 

याप्रमाणे हलके, सुपाच्य जेवण अगोदरच विचार करून ठरवून केल्यास सणाच्या जेवणाचा त्रास न होता आनंददायीच होतील. आणि शेवटी सण हे मनाला, शरीराला ताजेतवाने करण्यासाठी च असतात. त्यामुळे एरवी आहार व्यवस्थित असावा जेणेकरून क्वचित होणारे जड जेवण त्रासदायक होत नाही. Without guilt मनसोक्त खावे. पण ते पचेल याची काळजी घ्यावी. 

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वैद्य रेवती साखरे-गर्गे 

एम् डी आयुर्वेद 

आयुर्वेद आहारतज्ञ

( लेख आवडल्यास या पद्धतीने करून बघा, फॉलो करा, शेअर करा, कृपया लेखिकेचे नाव जरूर नमूद करा.)

Photo source : Internet 





No comments:

Post a Comment

Jowar Paratha

                                                                    ज्वारीचा पराठा किंवा दशमी ज्वारीला जोंधळे असेही म्हणतात याशिवाय याची वेग...