Showing posts with label Seasonal recipes. Show all posts
Showing posts with label Seasonal recipes. Show all posts

Monday, April 7, 2025

गोंद कतीरा

                                    गोंद कतीरा         


गूळापासून ऊसाच्या रसाच्या घवघवीत यशानंतर गेल्या वर्षी ताडगोळ्याला वेडावाकडा ताडल्यानंतर यंदा वर्णी लागलीय गोंद कतीरा ची..!

कधीपासून गोंद कतीरा वापरून केलेले so called Coolers चे व्हिडिओ दिसताहेत.

परवा मैत्रिणीसोबत पण विषय झाला.

न राहवून शेवटी आज जरा अधिक खोलवर बघितले की गोंद कतीरा वापरुन मार्केट में क्या नया है?

तर गोंद कतीरा घालून, त्यामध्ये फळे, दुध.!

गोंद कतीरा घालून भरपूर बदाम घातलेले दुध.!

गोंद कतीरा आणि भरपूर म्हणजे एका ग्लास साठी किमान ५-६ बर्फाचे खडे घालून केलेले सरबत किंवा पेय.!

अशा अनेक recipes, एका मावशींनी तर खाली custard आणि त्यावर गोंद कतीरा चे आच्छादन केलेले होते.

मला भारतीय स्त्रियांचे कायम कौतुक वाटते की त्यांना “कोंड्याचे मांडे” करण्याची कला उपजतच असते.

पण आला एखादा trend की काहीही शहानिशा न करता viral करत बसायच म्हणजे जरा जास्तच होतं!

याच्या background ला “यह गोंद कतीरा bone density बढाता है” अस सांगणारा एक आवाज play होतो.

शरीराला थंडावा देतो आणि bone density वाढवतो एवढंच काय ते लक्षात घेतलेलं.

आणि आता bone density normal आहे की नाही हे कोणी ठरवायचं? त्याचे निकष काय? पाहिलंय का? तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आहे का?

मूळात कोणताही पदार्थ सेवन करण्याची पध्दत महत्वाची आहे.

दुधामध्ये फळे गोंद कतीरा हे योग्य नाही भरमसाठ फळं त्यामध्ये आणि ढीगभर बर्फ हेही योग्य नाही.

गोंद कतीरा हा एक प्रकारचा डिंक आहे. जो पाणी घातल्याने जवळपास ४ पट फुलतो. हा शीतल आहे म्हणजे गुणांनी थंड आहे. दाह कमी करणारा आहे. काहीसा सारक म्हणजे पोट साफ करणारा, तर गुरु म्हणजे पचायला जड आहे. त्यामुळे ज्यांना अन्नपचनाचा त्रास आहे, त्यांनी मर्यादेतच घ्यावे. रक्तस्तंभन करणारा म्हणजे रक्त थांबवणारा आहे. त्यामुळे ज्या महिलांना पाळी येत नाही, किंवा पाळीच्या वेळी रक्तस्त्राव कमी होतो अशा महिलांनी टाळावे किंवा अल्प मात्रेत , क्वचित् घ्यावा. ज्यांना उन्हाळ्यात घोळणा फुटण्याची तक्रार असेल ते घेऊ शकतात.

हाडांसाठी चांगला असला तरी इतक्या मोठ्या प्रमाणात बर्फ घातल्याने त्यामधील (अति)शीत गुणाने हाडांना त्रासदायकच ठरणार आहे. आणि दुध, फळं आयुर्वेदानुसार विरुध्द आहे तर गोंद कतीरा घ्यायचाच असेल तर कसा घ्यायचा तर एखाद्या सरबतात जे माठातले पाणी वापरुन बिनाबर्फ केलेले आहे जसं लिंबू सरबत, आवळा, सरबत, कोकम सरबत, वाळा सरबत यामध्ये भिजवून फुललेला एक छोटा चमचा डिंक म्हणजे गोंद कतीरा त्यामध्ये विलायची पूड, घालून घ्यावे.

इतर अनेक थंडावा देणारे पदार्थ आहेत त्यांचा समावेश करावा.

नारळपाणी, काळ्या मनुकांचे पाणी, डाळिंबाचे सरबत, धन्याचे सरबत, आंबील, ताक, इ.

वेगवेगळी सरबते यासाठी ब्लॉग बघू शकता त्याची लिंक देत आहे.

https://drrevatigarge.blogspot.com/2018/04/blog-post_18.html


(लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही)

Photo Source : Internet



वैद्य रेवती साखरे – गर्गे

आयुर्वेद चिकित्सक आणि आहारतज्ञ

त्रिदल आयुर्वेद क्लिनिक , शनिवार पेठ, पुणे

8010454807

7219899833


Wednesday, April 18, 2018

मैं रंग शरबतों का.....

                                                           
       मै रंग शरबतों  का.....



                                                 
                                               उन्हाळा सुरु झालाय. सुर्यनारायण त्यांचा सप्त अश्व आरूढ रथ वेगाने हाकू लागलेत. बाहेर पडायचं म्हणजे जीव नको नको म्हणतोय. त्यात लग्नसराई ! छे ! सारखाच घसा कोरडा पडतो.  अशात मग कुछ ठंडा हो जाये ,  म्हणत कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या रिचवल्या जातात. लहान मुलांच्या हातात देखील सर्रास देतात. वरून अब जाके प्यास बुझी !! तहान भागवण्याच्या नादात आपण काय अन् किती प्रमाणात घेतलय याचा काही तर्क? याची माहिती आपण पुढील ब्लॉगमध्ये बघूच पण कदाचित् तुमचा प्रश्न असेल मग काय घ्यायचं? म्हणून हा blog.
                                               आधी उत्तर मग प्रश्नावर चर्चा  करूया. (अरेच्चा! हे तर जरा उलटच झालं) असो. आपण घरच्या घरी काही छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो, करतही असतो त्यासाठी काही सरबत किंवा शीतपेयांच्या रेसीपीस देत आहे. तर नक्की करून पहा आणि प्रतिक्रिया कळवा.

 कैरीचे पन्हे : उन्हाळा काहीसा सुखकर होतो तो दोनच गोष्टींमुळे एक फळांचा राजा आंब्याचा रस आणि दुसरा म्हणजे कैरीचे पन्हे. या दोन कारणामुळेच निदान 'मी' तरी उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते.



कृती : कैरी कुकरमध्ये वाफवून घ्यावी. तिचा गर काढून त्यामध्ये चवीनुसार गूळ किंवा साखर ( खडीसाखर ) दोन्ही एकत्र घातल्यासही चव छान येते. त्यात किंचित वेलायची, जायफळ पूड किंचित् सैंधव घालून माठातील थंड पाणी (फ्रीज किंवा बर्फाचे पाणी शक्यतो टाळावे) घालून प्यावे. हे मिश्रण करून ठेवले आणि आयत्या वेळी पाणी घालूनही घेता येते.

 कच्च्या कैरीचे पन्हे : कैरी किसून रस काढून घ्यावा, पाणी, चवीनुसार साखर, मीठ ( सैंधव) घालून घ्यावे.



 लिंबू सरबत : करायला सहज, सोपे आणि सर्वांना आवडणारे. लिंबू शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवते. बाहेर सहज मिळते परंतु त्यामध्ये वापरला जाणारा बर्फ दुषित असू शकतो त्यामुळे बाहेर पडावयाचे असल्यास एका बाटलीत घरून करून घेतल्यास उत्तम!

कोकम सरबत : आमसूल भिजवून, गाळून साखर,मीठ, पाणी घालून घ्यावे.



खस सरबत : वाळा किंवा वाळा पावडर पाण्यात काही वेळ भिजत घालावी नंतर साखर घालून घ्यावे. याला हिरवा रंग नाही येणार. परंतु synthetic रंग घालण्याचा आग्रह नको!  उन्हाळ्यात अत्यंत थंड आहे.

लिंबू-पुदिना सरबत : ताजा पुदिना बारीक करून, पाणी, लिंबू, जिरेपूड,साखर, मीठ, घालून प्यावे. हे सरबत अत्यंत चविष्ट, आल्हाददायक, थंड व पाचक आहे.

धणे-जिरे सरबत : धने आणि जीर्याचे पाणी असेही उन्हाळ्यात घ्यायला हरकत नाही. ४-५ चमचे धने , १ चमचा जिरे थोडेसे बारीक करून पाणी घालून ठेवावे काही वेळाने त्यात साखर, मीठ घालून प्यावे. आवडत असल्यास लिंबाचा रस घालू शकतो चवीला. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो तसाच काही पदर्थांची एक विशिष्ट चव असते तसेच काहीसे धने आणि जिरे  यांना स्वतःची  एक चव आहे आणि सुगंध सुद्धा!



बडीशेप सरबत : बडीशेप बारीक करून त्यात पाणी घालून ठेवावे. एका बाजूल काळ्या मनुका घेऊन पाणी घालून ठेवावे. काळ्या मनुका मिक्सर मध्ये बारीक करून बडीशेप व काळ्या मनुका एकत्र गळून घ्याव्यात. त्यामध्ये साखर व लिंबाचा रस घालावा. कडकडीत उन्हात हे सरबत नक्कीच थंड शिवाय जाठाराग्नी प्रदीप्त करेल.

खजुरादि मंथ : खजूर , काळ्या मनुका किंवा द्राक्षे , आवळा , चिंच आणि डाळिंबाचे दाणे या सर्वांचे छोटे छोटे तुकडे करून या सर्वात ४ भाग पाणी घालून ठेऊन द्यावे. काही वेळाने रवीने घुसळून गळून घ्यावे. रवीने घुसळणे म्हणजे मंथन करणे म्हणून यास मंथ असे नाव आहे. 

आवळा सरबत : उन्हाळ्याचा विचार करून साधारण आवळ्याच्या दिवसात हे सरबत करून ठेवता येते. आवळ्याचा रस काढून त्यामध्ये साखर, मीठ (याठिकाणी आपले साधे मीठ वापरण्यास हरकत नाही) चवीपुरता आल्याचा रस घालून ठेवावे. आयत्या वेळी पाणी घालून छान सरबत करता येते.

फालसा सरबत : ज्याठिकाणी फालसा(पळशी) चे ताजे फळ मिळणे शक्य आहे त्यांनी करावयास उत्तम असा प्रकार. फालसा ची फळे धुऊन स्वच्छ करून घ्यावीत. मिक्सर मध्ये साखर आणि पाणी घालून बारीक करून घ्यावे. त्यामध्ये फालसा ची फळे व आणखी थोडे पाणी घालून बारीक करून घ्यावे पुरेसे पाणी व मीठ घालून प्यावे.

किवी पन्हे : किवी म्हणजे चीन चे राष्ट्रीय फळ बरं का ! गेल्या काही वर्षात "A rich source of vitamin C" म्हणून प्रसिद्ध झाले. अर्थात एकदम खरे आहे ! म्हणून हे पन्हे करून बघायला काय हरकत आहे.
कृती : किवी भरीत करण्यासाठी वांगे भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्यावे. त्याची साल काढून टाकावी. त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, साखर चवीपुरते मीठ, जिरे, आले घालून बारीक करून घ्यावे , काळे मीठ, लिंबाचा रस, पाणी घालून  प्यावे.

चिंचेचे पन्हे : चिंच पाण्यात भिजत घालावी, चिंचेचा कोळ काढू गाळून घ्यावे गूळ घालून मीठ घालून प्यावे.

लस्सी : ताज्या सायीच्या दह्याची लस्सी मलई घालून घेण्यास हरकत नाही.

सोलकढी : या कढीचे  माहेर तसे कोकणातले. परंतु हल्ली सगळी कडे मिळते आणि चवीला तर फारच सुरेख! ओल्या नारळाचे दुध घ्यावे. आमसूल भिजत घालून कोळून पाणी गाळून घ्यावे. त्यामध्ये किंचित आल्याचा रस घालावा. चवीपुरते मीठ व साखर घालावी, वरून तूप, जिरे, कढीपत्ता यांची फोडणी घालावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून प्यावी.
 
वैद्य. रेवती गर्गे
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक
8010454807

( आपण पोस्ट व फोटो  share करत असालच. आम्हाला आनंदच आहे. तर कृपया लेखिकेच्या नावासह share करावे.) 

Jowar Paratha

                                                                    ज्वारीचा पराठा किंवा दशमी ज्वारीला जोंधळे असेही म्हणतात याशिवाय याची वेग...