Friday, October 12, 2018

दाडिमपाक

                                                                                  दाडिमपाक 
 
                                           
                                                   
                                                 श्रावणाच्या सुरुवातीपासून सणवाराची अगदी रेलचेल असते. गौरी-गणपती झाल्यानंतर मत्र पितृपक्षात थोडे उन वाढते. आणि हा ऋतुसंधी चा काल थोडा विचित्र असतो. उष्णता वाढलेली असते तर थोडी थंडी ला सुरुवात झालेली असते. वर्षा ऋतुत संचित झालेल्या पित्ताचा प्रकोप होण्यास सुरुवात होते. या काळात पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून  विरेचन केले जाते.
                                                   अशा या वातावरणात काय खावे असा थोडा प्रश्न असतो. डाळिंबाचा  सीझन असल्याने आज डाळिंबाची छान रेसिपी पाहूया. लहान मुलांच्या डब्यासाठी देखील उत्तम पर्याय आहे. बाहेर मिळणाऱ्या jams  मध्ये preservatives असतात. त्याऐवजी आपण याचा उपयोग करू शकतो. डाळिंब दिसायलाच सुंदर असल्याने रंगही छान असतो शिवाय चवदार असते आणि टिकते सुद्धा छान.
                                                      आणि तसेही नवरात्र चालू आहे. उपवास असतानाही हा पर्याय आवडेल.

                 
दाडिमपाक :

साहित्य :

१. 100 ml डाळिंबाचा रस
२. १००gm साखर
३. १-२ चमचे लिंबाचा रस.
४. विलायची पूड

कृती :

१. २-३ डाळिंबाचे दाणे काढून एका सुती कपड्यात ठेऊन,  पिळून त्याचा रस काढून घ्यावा.
२. एका भांड्यात रस व साखर एकत्र करून  गॅसवर ठेवावे.
३. एक किंवा दोन तारी पाक करावा.
४.  हे मिश्रण आणखी उकळत ठेवल्यास jam  सारखी consistency मिळते.
५. त्यानंतर थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालावा.
६. आवडत असल्यास विलायची पूड घालू शकता.
७. हे फ्रीज मध्ये छान टिकते. लहान मुलांना पोळीसोबत देखील खाण्यास उत्तम आहे.

उपयोग :
१. पित्त शमन करते.
२. तहान शमविते.
३. अग्निदीपक आहे.
४ . हृदयास हितकार आहे.
५. तुरट, आंबट, मधुर रसाचे आहे.
६. रक्तवर्धक आहे.

               

Thursday, May 31, 2018

आ..आंब्याचा....!


                                                                          आ..आंब्याचा....!
                                                  



                                                नमस्कार!  Blog post करण्यात काही कारणामुळे उशीर झाला. त्याबद्दल खरच दिलगिरी व्यक्त करते. असो! पण आपण हा सगळा backlog भरून काढूया.
                                                  सध्या तर सूर्यनारायण एकदम प्रसन्न आहेत सर्वांवर. परंतु उन्हाळा सुखद वाटतो तो एका गोष्टीमुळे तो म्हणजे फळांचा राजा आंब्याचे आगमन. आंबा कुणाला आवडत नाही अशी व्यक्ती दुर्मिळच आणि समजा असेलच तर त्याला स्वर्गसुख उपभोगता येत नाही अस म्हणायला हरकत नाही ( थोडी अतिशयोक्ती वाटेल पण खरे आहे ते.) आजकाल "आम हर मौसम मिले है|" असे असले तरी या दिवसात आंब्याला जी चव असते ती नंतर कशी हो असणार? शिवाय आपण मागे बघितलय ना कि seasonal फळे खायचीत म्हणून. तीही ताजी. म्हणूनच आपण या ब्लॉग मध्ये आंबा आणि कैरी यांचे गुण बघूया.

बहुगुणी आंबा :

आंब्याचा मोहोर :
थंड, रुची उत्पन्न करणारा, वातकारक, अतिसार, कफ पित्त, प्रमेह, व दुष्ट रक्त नाहीसे करतो.

कोवळा आंबा :
तुरट, आंबट, रुचीकर, व वातपित्तकर आहे.

कच्चा आंबा :
आंबट व रुक्ष असून त्रिदोष व राक्तविकारनाशक  आहे.

पिकलेला आंबा:
गोड, बल देणारा, स्निग्ध, आल्हाददायक, पचण्यास जड, हृद्य, वर्ण खुलवणारा, पित्तकर नाही.

झाडावर पिकलेला आंबा :
जड, वातनाशक, मधुर, आंबट, व किंचित पित्त वाढविणारा आहे.

आंबा अतिशय उपयुक्त आहे.असा एकही भाग नाही जो औषधी नाही.

त्यामध्ये fats चे प्रमाण कमी आहे. sodium चे देखील. शिवाय cholesterol ची भीती नाही.
Vit A, B,C, E आणि K असतात.

शिवाय calcium, manganese, magnesium, zinc असते.
सीझन मध्ये खाऊन तुम्ही शरीरात vit B साठवून ठेऊ शकतात.

कैरी आणि आंबा यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. का? तर त्यावर संस्कार होतो उष्णतेचा.

आयुर्वेदात सांगिलेले आहे..
 संस्काराने गुणात बदल होतो. माणूस ही संस्कारांनीच घडतो. मातीच्या गोळ्याला सुद्धा संस्कार झाल्यावरच सुंदर असे मडके तयार होते. तसेच आहे. सुर्यताप, उष्णता यांचा संस्कार म्हणजेच काय तर प्रक्रिया झाल्यावर गुणवृद्धी होते. म्हणून आंबा त्याच्या कलिका अवस्थेपासून पक्व अवस्थेपर्यंत एवढेच काय तर बीज सुद्धा उपयुक्त आहे फक्त वेगवेगळ्या अवस्थेत.

निसर्गाच्या कोणत्याही गोष्टीवर कोणत्या पद्धतीची प्रक्रिया यावर गुणधर्म ठरतात. आजकाल आपल्यापर्यंत येणाऱ्या फळांवर फवारणी झालेली असते. त्यामुळे गुणांमध्ये नक्कीच बदल होतो. त्यामुळे घेतानाच आपण सेंद्रिय  फळे घेतली तर नक्कीच अपेक्षित फायदा होऊ शकतो.

शिवाय एका ठराविक पद्धतीने आंबा किंवा कैरी चे वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवण्याची पद्धत आहे. तर उन्हात वाळवलेले पदार्थ, साखरेच्या पाकात किंवा मिठात करून ठेवण्यापर्यंत ठीक आहे परंतु pulp साठवणे, किंवा विकत घेतलेले लोणचे असे पदार्थ करण्यासाठी preservatives वापरलेले असते तर यापेक्षा ताजी आणून खाणे व लोणचे, गूळ/साखर आंबा घरी तयार करून खाणे योग्य.

आंबा हे फळ च मुळात glamorous झालेले आहे. त्यामुळे सर्रास कोणत्याही पदार्थात वापरला जातो आहे. परंतु असे करताना साध्या भाषेत सांगायचं तर deadly combinations असतात हो! तर आपण असे खात असतांना वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होत असतात त्याचा नक्की विचार करावा.

आणि खाताना अति मात्रेत नेहमीच घातक असते. म्हणून खा पण काळजी पण घ्या.

Happy Mango Season!!!

Wednesday, April 18, 2018

मैं रंग शरबतों का.....

                                                           
       मै रंग शरबतों  का.....



                                                 
                                               उन्हाळा सुरु झालाय. सुर्यनारायण त्यांचा सप्त अश्व आरूढ रथ वेगाने हाकू लागलेत. बाहेर पडायचं म्हणजे जीव नको नको म्हणतोय. त्यात लग्नसराई ! छे ! सारखाच घसा कोरडा पडतो.  अशात मग कुछ ठंडा हो जाये ,  म्हणत कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या रिचवल्या जातात. लहान मुलांच्या हातात देखील सर्रास देतात. वरून अब जाके प्यास बुझी !! तहान भागवण्याच्या नादात आपण काय अन् किती प्रमाणात घेतलय याचा काही तर्क? याची माहिती आपण पुढील ब्लॉगमध्ये बघूच पण कदाचित् तुमचा प्रश्न असेल मग काय घ्यायचं? म्हणून हा blog.
                                               आधी उत्तर मग प्रश्नावर चर्चा  करूया. (अरेच्चा! हे तर जरा उलटच झालं) असो. आपण घरच्या घरी काही छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो, करतही असतो त्यासाठी काही सरबत किंवा शीतपेयांच्या रेसीपीस देत आहे. तर नक्की करून पहा आणि प्रतिक्रिया कळवा.

 कैरीचे पन्हे : उन्हाळा काहीसा सुखकर होतो तो दोनच गोष्टींमुळे एक फळांचा राजा आंब्याचा रस आणि दुसरा म्हणजे कैरीचे पन्हे. या दोन कारणामुळेच निदान 'मी' तरी उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते.



कृती : कैरी कुकरमध्ये वाफवून घ्यावी. तिचा गर काढून त्यामध्ये चवीनुसार गूळ किंवा साखर ( खडीसाखर ) दोन्ही एकत्र घातल्यासही चव छान येते. त्यात किंचित वेलायची, जायफळ पूड किंचित् सैंधव घालून माठातील थंड पाणी (फ्रीज किंवा बर्फाचे पाणी शक्यतो टाळावे) घालून प्यावे. हे मिश्रण करून ठेवले आणि आयत्या वेळी पाणी घालूनही घेता येते.

 कच्च्या कैरीचे पन्हे : कैरी किसून रस काढून घ्यावा, पाणी, चवीनुसार साखर, मीठ ( सैंधव) घालून घ्यावे.



 लिंबू सरबत : करायला सहज, सोपे आणि सर्वांना आवडणारे. लिंबू शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवते. बाहेर सहज मिळते परंतु त्यामध्ये वापरला जाणारा बर्फ दुषित असू शकतो त्यामुळे बाहेर पडावयाचे असल्यास एका बाटलीत घरून करून घेतल्यास उत्तम!

कोकम सरबत : आमसूल भिजवून, गाळून साखर,मीठ, पाणी घालून घ्यावे.



खस सरबत : वाळा किंवा वाळा पावडर पाण्यात काही वेळ भिजत घालावी नंतर साखर घालून घ्यावे. याला हिरवा रंग नाही येणार. परंतु synthetic रंग घालण्याचा आग्रह नको!  उन्हाळ्यात अत्यंत थंड आहे.

लिंबू-पुदिना सरबत : ताजा पुदिना बारीक करून, पाणी, लिंबू, जिरेपूड,साखर, मीठ, घालून प्यावे. हे सरबत अत्यंत चविष्ट, आल्हाददायक, थंड व पाचक आहे.

धणे-जिरे सरबत : धने आणि जीर्याचे पाणी असेही उन्हाळ्यात घ्यायला हरकत नाही. ४-५ चमचे धने , १ चमचा जिरे थोडेसे बारीक करून पाणी घालून ठेवावे काही वेळाने त्यात साखर, मीठ घालून प्यावे. आवडत असल्यास लिंबाचा रस घालू शकतो चवीला. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो तसाच काही पदर्थांची एक विशिष्ट चव असते तसेच काहीसे धने आणि जिरे  यांना स्वतःची  एक चव आहे आणि सुगंध सुद्धा!



बडीशेप सरबत : बडीशेप बारीक करून त्यात पाणी घालून ठेवावे. एका बाजूल काळ्या मनुका घेऊन पाणी घालून ठेवावे. काळ्या मनुका मिक्सर मध्ये बारीक करून बडीशेप व काळ्या मनुका एकत्र गळून घ्याव्यात. त्यामध्ये साखर व लिंबाचा रस घालावा. कडकडीत उन्हात हे सरबत नक्कीच थंड शिवाय जाठाराग्नी प्रदीप्त करेल.

खजुरादि मंथ : खजूर , काळ्या मनुका किंवा द्राक्षे , आवळा , चिंच आणि डाळिंबाचे दाणे या सर्वांचे छोटे छोटे तुकडे करून या सर्वात ४ भाग पाणी घालून ठेऊन द्यावे. काही वेळाने रवीने घुसळून गळून घ्यावे. रवीने घुसळणे म्हणजे मंथन करणे म्हणून यास मंथ असे नाव आहे. 

आवळा सरबत : उन्हाळ्याचा विचार करून साधारण आवळ्याच्या दिवसात हे सरबत करून ठेवता येते. आवळ्याचा रस काढून त्यामध्ये साखर, मीठ (याठिकाणी आपले साधे मीठ वापरण्यास हरकत नाही) चवीपुरता आल्याचा रस घालून ठेवावे. आयत्या वेळी पाणी घालून छान सरबत करता येते.

फालसा सरबत : ज्याठिकाणी फालसा(पळशी) चे ताजे फळ मिळणे शक्य आहे त्यांनी करावयास उत्तम असा प्रकार. फालसा ची फळे धुऊन स्वच्छ करून घ्यावीत. मिक्सर मध्ये साखर आणि पाणी घालून बारीक करून घ्यावे. त्यामध्ये फालसा ची फळे व आणखी थोडे पाणी घालून बारीक करून घ्यावे पुरेसे पाणी व मीठ घालून प्यावे.

किवी पन्हे : किवी म्हणजे चीन चे राष्ट्रीय फळ बरं का ! गेल्या काही वर्षात "A rich source of vitamin C" म्हणून प्रसिद्ध झाले. अर्थात एकदम खरे आहे ! म्हणून हे पन्हे करून बघायला काय हरकत आहे.
कृती : किवी भरीत करण्यासाठी वांगे भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्यावे. त्याची साल काढून टाकावी. त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, साखर चवीपुरते मीठ, जिरे, आले घालून बारीक करून घ्यावे , काळे मीठ, लिंबाचा रस, पाणी घालून  प्यावे.

चिंचेचे पन्हे : चिंच पाण्यात भिजत घालावी, चिंचेचा कोळ काढू गाळून घ्यावे गूळ घालून मीठ घालून प्यावे.

लस्सी : ताज्या सायीच्या दह्याची लस्सी मलई घालून घेण्यास हरकत नाही.

सोलकढी : या कढीचे  माहेर तसे कोकणातले. परंतु हल्ली सगळी कडे मिळते आणि चवीला तर फारच सुरेख! ओल्या नारळाचे दुध घ्यावे. आमसूल भिजत घालून कोळून पाणी गाळून घ्यावे. त्यामध्ये किंचित आल्याचा रस घालावा. चवीपुरते मीठ व साखर घालावी, वरून तूप, जिरे, कढीपत्ता यांची फोडणी घालावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून प्यावी.
 
वैद्य. रेवती गर्गे
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक
८२३७५०१५३१

( आपण पोस्ट व फोटो  share करत असालच. आम्हाला आनंदच आहे. तर कृपया लेखिकेच्या नावासह share करावे.) 

Wednesday, April 11, 2018

रस गोडी तैसा स्वाद...रसाला..!

                                               श्रीखंड भाग २
                                                            
              मागील भागात आपण श्रीखंड तयार करण्याची पद्धत बघितली. भीमसेनाने शोधलेल्या या व्यंजनाचे आजकाल अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आयुर्वेद सांगतो की दुध आणि फळे एकत्र खाणे हे विरुद्धाहार आहे. पण श्रीखंडाच्या बाबतीत ते अगदी विरुद्ध असे म्हणता येणार नाही. चक्का आणि फळे अम्ल रसाची असल्याने काही प्रमाणात आपण हे combination  करू शकतो. flavor येईल इतकाच pulp किंवा रस घालावा.
              फळांचे रस ज्याठिकाणी वापरावयाचे आहेत त्याठिकाणी त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या ( seasonal fruits ) चा च वापर करावा व फळे ताजीच वापरावीत. शिवाय बाहेर मिळणारे fruit pulp , powders, juices किंवा essence हमखास टाळावे. कारण या सर्व गोष्टी टिकवण्यासाठी त्यामध्ये preservatives चा वापर केलेला असतो. कितीही 'herbal' वाटत असले तरी preservatives शिवाय या गोष्टी टिकूच शकत नाहीत. पूर्वीपासून आपल्याकडे पदार्थ टिकवण्यासाठी मीठ किंवा साखर यांचा वापर केला जातो. परंतु मूळ पदार्थाची चव टिकवून आपली चव न जाणवू देणे हे तसं कठीणच ना ! म्हणून हल्ली sodium salt of benzoic acid म्हणजे Sodium benzoate! हे काका आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. उदा; लोणचे, jam, fruit juices, sauce,इ. आणि म्हणतात ना " अतिपरिचयादवज्ञा " या उक्तीप्रमाणे याच्या वारंवार सेवनाने कालांतराने  शरीरावर अनेक परिणाम दिसू लागतात जसे स्थूलता, रक्तदाब, मधुमेह, अकाली केस पांढरे होणे, इ ( याबद्दल स्वतंत्र लेख). मग हळूहळू आपण त्यांना टाळायला शिकले पाहिजे. ते येताना दिसले की रस्ता बदलून टाकायचा. त्याच बरोबर synthetic colors चा देखील वापर टाळावा. मुळातच निसर्गात इतके नैसर्गिक रंग उपलब्ध असतांना आपण तेच का वापरू नये? उदा; आम्रखंड बनवताना original आंब्याचा रस च वापरला तर..? रंग ही छान येईल आणि चव तर काय आहा!!
             बरं! असो!तर श्रीखंड बनविण्याकरिता आपण काही प्रयोग नक्कीच करू शकतो. एक मीही केलाय.

गुलकंद-श्रीखंड


चक्का तयार करण्याची पद्धत तर आपण बघितलीच आहे. तर चक्का घ्यावा.

खडीसाखर बारीक करून त्यामध्ये चवीनुसार घालावी.


मिश्रण चांगले फेटून घ्यावे.


त्यामध्ये गुलकंद घालून पुन्हा फेटून घ्यावे.


रंग हवा असल्यास बीटाचे  ५-६ थेंब किंवा केशर घालावे.

त्यामध्ये विलायची पूड, मिरेपूड, जायफळ घालावे.


         गुलकंद घातल्याने एक वेगळीच जिभेवर रेंगाळणारी चव येते. याचप्रमाणे आपण म्हटल्याप्रमाणे seasonal fruit फळांचा राजा आंब्याचा रस, गुलाब पाकळी, dry fruits, विलायची जायफळ, ओले खोबरे  घालूनही लज्जतदार श्रीखंड बनवू  शकतो. तर करून पहा. शिवाय आपल्याकडच्या गृहिणी इतक्या हुश्शार आणि innovative असतात की त्या नक्कीच आणखी काही पद्धती शोधणार किंवा शोधल्याही असतील. तर त्याही जरूर share करा.
                           पदार्थ कितीही नैसर्गिक पद्धतीने बनवलेला असला तरी तो प्रमाणात खाणे च योग्य. आवडणारी गोष्ट अतिप्रमाणात खाणे केव्हाही घातकच. शिवाय काही व्याधींमध्ये काही पदार्थ हे वर्ज्य केलेले असतात. अशा वेळी अपथ्य सेवन होणार नाही याची काळजी घ्यावी. तज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.

  • गुलकंद हे शीत गुणाचे असल्याने उन्हाळ्यातउपयुक्तआहे.
  • वारंवार पित्ताचा त्रास होणाऱ्या व्यक्तीस लाभदायक.
  • शिवाय श्रीखंडाचे गुणही अपेक्षित आहेतच.
  • परंतु अतिप्रमाणात खाल्ल्याने अग्निमांद्य करू शकते. शेवटी अति सर्वत्र वर्जयेत्|


प्रतिक्रिया जरूर कळवा.
            

वैद्य रेवती गर्गे
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक जळगाव.
८२३७५०१५३१


                                             

Saturday, April 7, 2018

रस गोडी तैसा स्वाद...रसाला..!


                                                                      ब्रह्मकर्म समाधिना.....!


                                               सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! आणि
                                               दिनविशेष म्हणजे जागतिक आरोग्य दिनाच्या आरोग्यमयी शुभेच्छा !!
                                               मी वैद्य सौ रेवती गर्गे आजपासून इंटरनेट च्या चावडीवर म्हणजे ब्लॉग च्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे आणि विषय अगदी तुमच्या माझ्या आवडीचा आहे. तसं नाव वाचून थोडाफार अंदाज आला असेलच...! अगदी बरोबर "खाणे"...!
                                                हो ना? आहे ना आवडता विषय..? हं बरं मग याठिकाणी आपण बघणार आहोत आयुर्वेदाच्या काही आहार पद्धती. अहो आयुर्वेद म्हणजे फक्त जडी बुटी नाही. तर आपल्या या प्राचीन शास्त्रात
 सर्व गोष्टीचा विचार केला गेलाय.  अगदी सकाळी उठल्यापासून काय करावे काय खावे कसे खावे इ.
                                               
                                                                 स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् |
                                                                 आतुरस्य विकारप्रशमनम् ||

                                                 म्हणजेच काय तर स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व आजारी व्यक्तीचा विकार दूर करणे.  आणि म्हणूच आयुर्वेदात काय करावे काय करू नये, काय खावे काय खाऊ नये, इ  गोष्टींचा उत्तम विचार मांडलेला आहे. आजकाल बदललेली दिनचर्या आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी (दुर्दैवाने यांचे  inverse relation आहे) यामुळे अनेक आजारांना खुले निमंत्रण आहे. म्हणून आपण थोडा विचार करून आपल्या आहाराच्या  काही सवयी बदलणे किंवा काही नवीन लावून घेणे ही काळाची गरज आहे. आपल्या आयुर्वेदात अशा खूप छान छान पौष्टिक recipes सांगितलेल्या आहेत किंवा काही आपल्या नेहमीचे पदार्थ  करण्याची पद्धत थोडी वेगळी सांगितली आहे. इतकेच नाही तर त्याचे गुणधर्म काय आहेत त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हेदेखील सांगितलेले आहे.
                                                  जेवण किंवा अन्नसेवन हे केवळ उदरभरण नाही तर हे एक यज्ञकर्म आहे. असे साक्षात् समर्थ रामदासांनी सांगितलेले आहे. भगवद्गीतेत ब्रह्मकर्म सांगितलेले आहे. बरोबरच आहे की, आपले पोट म्हणजे काय dustbin आहे का? आपण काय खातो त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो अपाय होतो कि फायदा होतो कि उपाय? हे आपल्याला माहित नको?
                                                   आजकाल तर आपल्यासमोर किती किती options असतात. "खाण्यासाठी जन्म आपुला" म्हणतच चाललाय कि सगळं. पण... असं करत असतांना आपण अनेकदा अशाही गोष्टी खात पीत असतो ज्याचा शरीराला फायदा कमी अन् तोटाच अधिक असतो.
                                                     यज्ञ करताना आहुती देताना आपण पेट्रोल किंवा रॉकेल का नाही वापरत? त्यानेही तर अग्नी प्रज्वलित होतच की...भडकाच होतो उलट. की ज्या काळात यज्ञपद्धती सांगितली गेली त्या काळात या गोष्टी माहित नसतील असं वाटत? नाही...उलट ते ऋषीमुनी सर्वज्ञानी होते. सृष्टीचा अभ्यास त्यांचा अधिक होता. परंतु गोघृत वापरण्यामागचे कारण असे की, ज्याप्रमाणे गोघृत सात्त्विक आहे, शुभ आहे त्याप्रमाणे यज्ञाचे फलित प्राप्त व्हावे. शिवाय जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्या शरीरातही अग्नी असतो जो अन्नपचनाचे काम करत असतो त्याचाही भडका होऊ द्यायचा नसतो की विझुही द्यायचा नसतो तर हळुवारपणे फुलवायचा असतो. पण काही खाताना आपण एवढा विचार करतो का...??
                                                        परंतु अनादि काळापासून आपल्या संस्कृतीत असा विचार केला गेलेला आहे. याठिकाणी आपण असेच काही व्यंजन बघणार आहोत ज्याचे आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. त्याचे गुणधर्म बघूया शिवाय त्याचे काही modifications किंवा प्रकार असतील तर त्याचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. उदा; आजकालचे trendy Ready to eat किंवा खोलो-घोलो-पिलो सारखे पदार्थ आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम होतो हेही बघण्याचा प्रयत्न करूया.
                                                       
                                                                    श्रीखंड भाग १
                                                     
                                                          सुरुवात काहीतरी sweet dish ने करावी म्हणून श्रीखंड.  श्रीखंड हा गुजरात व महाराष्ट्रीयन पदार्थ मानला जातो. महाभारतात भीमाने श्रीखंडाचा शोध लावला असे मानले जाते. महाभारतात अशी एक कथा आहे की एकदा श्रीकृष्ण भीमाला भेटायला गेले तेव्हा भीमाने त्यांना रसाला अर्थात् श्रीखंड खायला दिले. ते श्रीकृष्णाला खूप आवडले. ते त्यांनी भरपूर खाल्ले आणि बलवान झाले.
                                                     
  • आंबट दही विशेषकरून म्हशीच्या दुधापासून तयार केलेले दही घ्यावे. 
  • दह्याची  पुरचुंडी बांधून रात्रभर उंचावर टांगून ठेवावे ( त्यातील पूर्ण पाणी निघून जावे हा उद्देश).
  • त्या दह्यातील पूर्ण पाणी निघून गेल्यारच त्याला खाली येण्याची परवानगी  द्यावी.
  • त्यात साखर अं हं खडीसाखर बारीक करून घालावी.
  • त्यानंतर ते मस्त फेटून घ्यावे.
  • त्यात चवीला वेलायची, किंचित मिरे, जायफळ, घसघशीत सुकामेवा घालावे. किंचित् केशराचा केशरिया रंग श्रीखंडाचे सौंदर्य आणखी खुलवेल.
       
    
      कथेमध्ये श्रीखंडाचे जसे गुण सांगितलेले आहेत तसेच ते आहे.
  • जे कृश असतील त्यांना ग्रीष्म आणि शरद ऋतू मध्ये बाल देणारे आहे.
  • वात आणि पित्ताच्या तक्रारी दूर करते.
  • तहान, जळजळ ई वर उपयुक्त.
  • चक्का बल देणारा, साखर पित्तनाशक, मिरे व विलायची रुचीकर व पचनास मदत करणारी आहे. 
  • पुढील भागात आपण श्रीखंडाचे वेगवेगळे प्रकार पाहूया.  


                                                       

                                                  

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...