Wednesday, April 18, 2018

मैं रंग शरबतों का.....

                                                           
       मै रंग शरबतों  का.....



                                                 
                                               उन्हाळा सुरु झालाय. सुर्यनारायण त्यांचा सप्त अश्व आरूढ रथ वेगाने हाकू लागलेत. बाहेर पडायचं म्हणजे जीव नको नको म्हणतोय. त्यात लग्नसराई ! छे ! सारखाच घसा कोरडा पडतो.  अशात मग कुछ ठंडा हो जाये ,  म्हणत कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या रिचवल्या जातात. लहान मुलांच्या हातात देखील सर्रास देतात. वरून अब जाके प्यास बुझी !! तहान भागवण्याच्या नादात आपण काय अन् किती प्रमाणात घेतलय याचा काही तर्क? याची माहिती आपण पुढील ब्लॉगमध्ये बघूच पण कदाचित् तुमचा प्रश्न असेल मग काय घ्यायचं? म्हणून हा blog.
                                               आधी उत्तर मग प्रश्नावर चर्चा  करूया. (अरेच्चा! हे तर जरा उलटच झालं) असो. आपण घरच्या घरी काही छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो, करतही असतो त्यासाठी काही सरबत किंवा शीतपेयांच्या रेसीपीस देत आहे. तर नक्की करून पहा आणि प्रतिक्रिया कळवा.

 कैरीचे पन्हे : उन्हाळा काहीसा सुखकर होतो तो दोनच गोष्टींमुळे एक फळांचा राजा आंब्याचा रस आणि दुसरा म्हणजे कैरीचे पन्हे. या दोन कारणामुळेच निदान 'मी' तरी उन्हाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते.



कृती : कैरी कुकरमध्ये वाफवून घ्यावी. तिचा गर काढून त्यामध्ये चवीनुसार गूळ किंवा साखर ( खडीसाखर ) दोन्ही एकत्र घातल्यासही चव छान येते. त्यात किंचित वेलायची, जायफळ पूड किंचित् सैंधव घालून माठातील थंड पाणी (फ्रीज किंवा बर्फाचे पाणी शक्यतो टाळावे) घालून प्यावे. हे मिश्रण करून ठेवले आणि आयत्या वेळी पाणी घालूनही घेता येते.

 कच्च्या कैरीचे पन्हे : कैरी किसून रस काढून घ्यावा, पाणी, चवीनुसार साखर, मीठ ( सैंधव) घालून घ्यावे.



 लिंबू सरबत : करायला सहज, सोपे आणि सर्वांना आवडणारे. लिंबू शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवते. बाहेर सहज मिळते परंतु त्यामध्ये वापरला जाणारा बर्फ दुषित असू शकतो त्यामुळे बाहेर पडावयाचे असल्यास एका बाटलीत घरून करून घेतल्यास उत्तम!

कोकम सरबत : आमसूल भिजवून, गाळून साखर,मीठ, पाणी घालून घ्यावे.



खस सरबत : वाळा किंवा वाळा पावडर पाण्यात काही वेळ भिजत घालावी नंतर साखर घालून घ्यावे. याला हिरवा रंग नाही येणार. परंतु synthetic रंग घालण्याचा आग्रह नको!  उन्हाळ्यात अत्यंत थंड आहे.

लिंबू-पुदिना सरबत : ताजा पुदिना बारीक करून, पाणी, लिंबू, जिरेपूड,साखर, मीठ, घालून प्यावे. हे सरबत अत्यंत चविष्ट, आल्हाददायक, थंड व पाचक आहे.

धणे-जिरे सरबत : धने आणि जीर्याचे पाणी असेही उन्हाळ्यात घ्यायला हरकत नाही. ४-५ चमचे धने , १ चमचा जिरे थोडेसे बारीक करून पाणी घालून ठेवावे काही वेळाने त्यात साखर, मीठ घालून प्यावे. आवडत असल्यास लिंबाचा रस घालू शकतो चवीला. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो तसाच काही पदर्थांची एक विशिष्ट चव असते तसेच काहीसे धने आणि जिरे  यांना स्वतःची  एक चव आहे आणि सुगंध सुद्धा!



बडीशेप सरबत : बडीशेप बारीक करून त्यात पाणी घालून ठेवावे. एका बाजूल काळ्या मनुका घेऊन पाणी घालून ठेवावे. काळ्या मनुका मिक्सर मध्ये बारीक करून बडीशेप व काळ्या मनुका एकत्र गळून घ्याव्यात. त्यामध्ये साखर व लिंबाचा रस घालावा. कडकडीत उन्हात हे सरबत नक्कीच थंड शिवाय जाठाराग्नी प्रदीप्त करेल.

खजुरादि मंथ : खजूर , काळ्या मनुका किंवा द्राक्षे , आवळा , चिंच आणि डाळिंबाचे दाणे या सर्वांचे छोटे छोटे तुकडे करून या सर्वात ४ भाग पाणी घालून ठेऊन द्यावे. काही वेळाने रवीने घुसळून गळून घ्यावे. रवीने घुसळणे म्हणजे मंथन करणे म्हणून यास मंथ असे नाव आहे. 

आवळा सरबत : उन्हाळ्याचा विचार करून साधारण आवळ्याच्या दिवसात हे सरबत करून ठेवता येते. आवळ्याचा रस काढून त्यामध्ये साखर, मीठ (याठिकाणी आपले साधे मीठ वापरण्यास हरकत नाही) चवीपुरता आल्याचा रस घालून ठेवावे. आयत्या वेळी पाणी घालून छान सरबत करता येते.

फालसा सरबत : ज्याठिकाणी फालसा(पळशी) चे ताजे फळ मिळणे शक्य आहे त्यांनी करावयास उत्तम असा प्रकार. फालसा ची फळे धुऊन स्वच्छ करून घ्यावीत. मिक्सर मध्ये साखर आणि पाणी घालून बारीक करून घ्यावे. त्यामध्ये फालसा ची फळे व आणखी थोडे पाणी घालून बारीक करून घ्यावे पुरेसे पाणी व मीठ घालून प्यावे.

किवी पन्हे : किवी म्हणजे चीन चे राष्ट्रीय फळ बरं का ! गेल्या काही वर्षात "A rich source of vitamin C" म्हणून प्रसिद्ध झाले. अर्थात एकदम खरे आहे ! म्हणून हे पन्हे करून बघायला काय हरकत आहे.
कृती : किवी भरीत करण्यासाठी वांगे भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्यावे. त्याची साल काढून टाकावी. त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, साखर चवीपुरते मीठ, जिरे, आले घालून बारीक करून घ्यावे , काळे मीठ, लिंबाचा रस, पाणी घालून  प्यावे.

चिंचेचे पन्हे : चिंच पाण्यात भिजत घालावी, चिंचेचा कोळ काढू गाळून घ्यावे गूळ घालून मीठ घालून प्यावे.

लस्सी : ताज्या सायीच्या दह्याची लस्सी मलई घालून घेण्यास हरकत नाही.

सोलकढी : या कढीचे  माहेर तसे कोकणातले. परंतु हल्ली सगळी कडे मिळते आणि चवीला तर फारच सुरेख! ओल्या नारळाचे दुध घ्यावे. आमसूल भिजत घालून कोळून पाणी गाळून घ्यावे. त्यामध्ये किंचित आल्याचा रस घालावा. चवीपुरते मीठ व साखर घालावी, वरून तूप, जिरे, कढीपत्ता यांची फोडणी घालावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून प्यावी.
 
वैद्य. रेवती गर्गे
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक
८२३७५०१५३१

( आपण पोस्ट व फोटो  share करत असालच. आम्हाला आनंदच आहे. तर कृपया लेखिकेच्या नावासह share करावे.) 

7 comments:

  1. Chan , sarbtanche anek prakar ekach thikani . So kadhi awesome. Drakshasav lihaycha rahil na.

    ReplyDelete
  2. Chan , sgle sarbtanche prakar ekach thikani , Drakshasav lihaycha rahil na.

    ReplyDelete
  3. Useful recipes..nice Revti..:)

    ReplyDelete
  4. नेहमी प्रमाणे सुंदर

    ReplyDelete

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...