कैरीची डाळ आणि पन्हे
अन्नपूर्णेचा आशिर्वाद रहावा म्हणून नवीन लग्न झालेली नवरी आपल्यासोबत अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन येते. ते घर अन्न धान्याने भरलेले रहावे, समृद्ध रहावे म्हणून जणू काही ती पाठराखण म्हणूनच सोबत येते आणि मग वेगवेगळ्या वेळी या अन्नपूर्णेची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. अन्नपूर्णा पार्वतीचे रुप! म्हणजे गौरी! एकदा भगवान शंकर भौतिक जगाला अन्नासह भ्रम असे म्हणाले तेव्हा पार्वतीला राग आला आणि ती गायब झाली. जगातील अन्नधान्य सुद्धा गायब झाले. सगळीकडे दुष्काळ पसरला. नंतर मात्र सृष्टीचे चे हाल बघून देवीला दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या रुपात प्रकट झाली त्यावेळी भगवान शंकर देखील तिच्याकडे भिक्षा मागायला आले. अशी कथा आहे. आपण सर्वांनी ते चित्र देखील बघितले आहे.
असे हे अन्नपूर्णा गौरीचे रूप त्यामुळे वेगवेगळ्या काळात तिची पूजा केली जाते. श्रावणात मंगळागौर, मार्गशिर्षात उत्तर भारतात तर चैत्रात चैत्र गौरीचे पूजन महाराष्ट्रात , कर्नाटकात केले जाते. राजस्थानात होळीपासून चैत्र महिना सुरु होतो. या दिवशी गणगौर बसवतात. होळीच्या राखेचे आणि शेणाचे मुटके म्हणजे देवीचे प्रतिकात्मक रूप. तर गव्हाच्या ओंब्या आणि हळद यांनी पूजा केली जाते. ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा म्हणजे शंकर तर एका कणसाला लाल पिवळा धागा बांधला जातो म्हणजे पार्वती. हे गौरीचे प्रतिक मानले जाते. यावेळी चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो.
आदिवासी भागातही चैत्र गौरीचे पूजन केले जाते. ६ दिवस आधी वेगवेगळी धान्ये पेऊन नंतर देवीचे पूजन केले जाते. थोडक्यात अन्नपूर्णा ती! तिचे पूजन अन्नधान्य , फळे तिला अर्पण करून तिच्याप्रती कृतज्ञ भाव दर्शवण्याच्या विविध पद्धती रूढ झालेल्या दिसून येतात. ऋग्वेदामध्ये अग्निदेवतेची पूजा केली जात असे जे जे आपण अग्निला अर्पण करू ते ते अग्नि आपल्याला देईल अशी मान्यता होती. तशाच संकल्पना या पद्धती रूढ होण्यामागे जाणवतात.
महाराष्ट्रात गुढी पाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंत म्हणजे साधारण एक महिना चैत्रगौरीचे पूजन आणि हळदी कुंकू केले जाते. यानिमित्ताने मैत्रिणी एकत्र जाणत्यामुळे उन्हाळा आल्हाददायक होतो. मग थकवा घालवण्यासाठी कैरीचे पन्हे आणि डाळ वाटली जाते. चैत्रगौर म्हणजे झोपल्यात बसलेली देवीची प्रतिमा ,तिचे पूजन केले जाते. गौरी माहेरी आली असे मानले जाते. किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा केली जाते. या ऋतुत येणारी वेगवेगळी फळे ही आरास रचून पूजा केली जाते. पण विशेष महत्व असते ते म्हणजे या काळात येणारी कैरी वापरून केलेले पन्हे , आंब्याची डाळ आणि ओटीला भिजवलेले चणे.
हरभरा साधारण मार्च मध्ये शेतातून घरी येतो. आपल्याकडे शेती आणि सणवार हातात हात घालून च चालतात असे बऱ्याचदा जाणवते. पुढे येणाऱ्या सणाला त्याचे दान. म्हणून हे भिजवलेले हरभरे चांगले पोटभरीचे ठरतात. या दिवसात शरीराला तरतरी यावी, थंडावा मिळावा म्हणून कैरीचे पन्हे तर हरभरा डाळ भिजवून कैरीचा कीस घालून वाटून केली जाते. या दिवसात अन्न खाण्याची इच्छा होत नाही. असे आंबट चवदार काही बरे वाटते त्यासाठी ही कैरीचे डाळ उत्तम होते. आणि कैरीमुळे हरभऱ्याच्या रुक्षतेचाही त्रास होत नाही. वातकर होत नाही. फक्त चामच्याचे प्रमाण वाटीवर नेऊ नये म्हणजे झाले! चला तर मग साहित्य आणि कृती बघूया. पन्हे आणि कैरीची डाळ किंवा आंबा डाळ.
कैरीचे पन्हे :
साहित्य : कैरी, १
कैरी फार आंबट असेल तर खडीसाखर आणि कलमी असेल तर गूळ ( अथवा आपल्या आवडीनुसार)
उकडलेल्या कैरीचा गर एक वाटी
जेवढा गर तेवढा गूळ किंवा ३/४ कप खडीसाखर
सैंधव मीठ १ टीस्पून
विलायची पूड १ टीस्पून
जिरेपूड १/२ टीस्पून
केशर ४-५ काड्या
कृती :
सर्वप्रथम कैरी उकडून घ्यावी.
तिचा गर काढून घ्यावा
एकीकडे साखर किंवा गूळ बारीक करून घ्यावे.
मिक्सर मध्ये आधी कैरीचा गर, खडीसाखर, सैंधव, केशर, विलायची पूड, जिरेपूड, खडीसाखर एकत्र बारीक करून घ्यावे.
हा गर लागेल तसा घेऊन पाणी घालून प्यायला घेता येते.
कैरीची डाळ :
भिजवलेली हरभरा डाळ १ वाटी
कैरी १/२ ते ३/४ वाटी
कोथिंबीर बारीक चिरलेली १/४ वाटी
मिरची १-२ / आवडीनुसार किती तिखट आहे त्यानुसार
साखर २ चमचे
मीठ १ चमचा
जिरे १ टीस्पून
मोहरी १ टीस्पून
कडीपत्ता ७-८ पाने
हिंग १/४ टीस्पूनहळद १/२ टीस्पून
तेल २ टेस्पून
कृती :
१. भिजवलेली डाळ, थोडी मिरची वाटणात थोडी फोडणीसाठी ठेवावी , मीठ, साखर गळून एकत्र वाटून घ्यावी. मिश्रण वाटताना फार बारीक नको काहीसे जाडसर हवे.
२. त्यामध्ये कैरीचा कीस घालून चांगले मिसळून घ्यावे.
३. नंतर एक भांड्यामध्ये काढून त्यावर फोडणी घालावी त्यासाठी तेल तापत ठेवावे तेल तापल्यावर त्यात मोहरी घालावी, मोहरी तडतडली, जिरे घालावे त्यानंतर हिंग, मिरची, कडीपत्ता, हळद याप्रमाणे घालून गॅस बंद करावा व ही फोडणी वाटलेल्या डाळीवर घालावी.
गणपती मध्ये बाप्पाला निरोप देताना अशीच डाळ केली जाते त्यामध्ये त्या दिवसात कैरी मिळत नाही त्यामुळे लिंबाचा रस घातला जातो.
गुणधर्म :
१. पन्हे हे उन्हाळ्यात उत्तम पेय ठरते. हे प्रीणन कार्य करते अर्थात् यामुळे तरतरी येते.
२. उन्हाळ्यामध्ये अन्न खायची फारशी इच्छा होत नाही. तोंडाला कोरड पडते. थकवा वाटतो. अशा वेळी तोंडाला चव यावी, थकवा दूर व्हावा म्हणून पन्हे चांगले काम करते.
३. हरभरा डाळ ही चवदार पण रुक्ष आणि वातकर आहे त्यामुळे कैरी आणि वरून घातलेली फोडणी यामुळे ती पचायला सुलभ होते.आपले पूर्वज खरंच किती हुशार होते!
४. डाव्या बाजूला चटणी प्रमाणे वाढली तर अन्न रुचकर लागते, कैरीच्या अंगभूत गुणामुळे अग्नि चांगला प्रदीप्त होतो. सर्व रस म्हणजे सर्व चवींचा उत्तम मेळ या डाळीमध्ये उत्तम प्रकारे साधला जातो.
५. ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी गुळाच्या ऐवजी खडीसाखरेचे पन्हे घ्यावे. आणि कैरीची डाळ वाटताना त्यामध्ये १/२ वाटी ओल्या नारळाचा जव घालावा.
६. आधुनिकदृष्ट्या बघता ही डाळ प्रोटीन्स आणि iron चा उत्तम स्रोत आहे. आणि कैरी व्हिटामिन C चा! हे iron शरीरात व्यवस्थितरीत्या शोषले जावे यासाठी व्हिटामिन C ची गरज असते अन्यथा ते व्यर्थ होते आणि पचायला जड होते म्हणून हे कॉम्बिनेशन! आहे की नाही कमाल!
अशा प्रकारे तुम्ही कैरीची डाळ कशी करतात ते आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत केली नसेल तर नक्की करून बघा. भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थ खूप छान, वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यांच्यामागे शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत. तीच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आवडल्यास नक्की शेअर करा.
(लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही)
वैद्य रेवती साखरे – गर्गे
आयुर्वेद चिकित्सक आणि आहारतज्ञ
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक , शनिवार पेठ, पुणे
8010454807
7219899833
No comments:
Post a Comment