होळी रे होळी पुरणाची पोळी
होळी रे होळी पुरणाची पोळी हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलेले असतो. पुरण पोळी ही महाराष्ट्राची signature dish आहे असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येक पदार्थाची एक खासियत असते. पण जिभेवर पडताच थेट काळजाचा ठाव घेते ती म्हणजे पुरण पोळी. पुरण पोळी फक्त महाराष्ट्रातच नाही केली जाते असं नाही बरं का! तर दक्षिण भारतातही पुरण पोळी केली जाते. १२ व्या शतकातील "मानसोल्लास" या ग्रंथात पुरण पोळीचा उल्लेख आहे. "ज्ञानेश्वरी" मध्ये देखील पुरणपोळीचा उल्लेख आहे. "ज्ञानेश्वरी" मध्ये देखील पुरण पोळी चा उल्लेख अध्लतो. "मनुचरित्र" या तेलुगु ग्रंथात पुरण पोळी बद्दल वर्णन आढळते. "भावप्रकाश" या ग्रंथात उल्लेख आढळतो. महाराष्ट्रात हरभरा डाळीचे पुरण केले जाते. तर गुजरात मध्ये तुरीच्या डाळीचे पुरण केले जाते. तर दक्षिण भारतातील काही भागात मुगाच्या डाळीचे पुरण करण्याचा प्रघात आहे. हे सर्व असले तरी आज महाराष्ट्र म्हणजे पुरण पोळी, पुरण पोळी म्हणजे महाराष्ट्र हे समीकरण साता समुद्रापार पोहोचले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. आज अनेक महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी या पुरण पोळी मूळे झालेल्या आहेत, ही देखील मोठी गोष्ट आहे. होळी ला पुरण पोळी च का केली जाते तर सणवार आणि शेती याचं कायमच एक नाते असते. पुरण केले जाते ते गहू आणि हरभरा ही रब्बी पिके आहेत. म्हणजे याची कापणी मार्च महिन्यात केली जाते या महिन्यात येणारा सण म्हणजे होळी. अशा वेळी नवीन धान्याचा देवाला नैवेद्य म्हणून या द्रव्यांपासून केलेली पुरण पोळी ! पुरण पोळी करण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. खान्देशातील पुरणाचे मांडे तर खरोखर कौशल्याचे काम!
याशिवाय थापून केलेली पोळी, नागपंचमीला केले जातात पुरणाचे दिंड, अधिक महिन्यात केले जातात ते पुरणाचे धोंडे. असा पुरणाचा मान च वेगळा आहे. कुलाचार विधींना , देवीच्या नैवेद्याला , दिवाळी ला लक्ष्मीपूजनाला पुरण हे हवेच!
आणि यावर्षी तर काय होळीच्या दिवशी रविवार च आलाय , मग काय मस्त पुरणपोळी हाणायची आणि ताणून द्यायचं मस्त दिवसभर. आणि मग संध्याकाळी चहा घेतला की एक Antacid गिळून टाकायची पाण्याबरोबर. असच आहे का? नको ना? अशी एक कथा आहे की शिवाजी महाराजांचे मावळे ज्यावेळी युद्धाला जात ,किंवा आल्यानंतर जिंकावे किंवा जिंकून आल्यानंतर गोड धोड करावे म्हणून पुरण पोळी केली जात असे. त्यानंतर युद्ध बंद झालीत म्हणून पुरण पोळीला सणावारासोबत बांधली गेली .
थोडक्यात योद्ध्यांसाठी पुरण पोळी केली जात असे. त्यांचा आहार आणि व्यायाम सुद्धा त्या प्रकारचा होता. आपणही ऐकत असतो की पूर्वीचे लोक ३-४ पुरण पोळी खात असत. भरपूर तुपासोबत तीही अगदी गोssड असायची. मुळात त्या काळात लोकांची पचनशक्ती उत्तम होती, व्यायाम खूप असायचा जीवनशैली अशी होती की त्यामध्ये शारीरिक श्रम होत असत. हल्लीच्या काळात बदललेल्या जीवनशैली मध्ये हरभरा डाळीचे पुरण पचायला काहीसे जड होते. हरभरा डाळ हि वातूळ आहे, पित्त करणारी आहे, रुक्ष आहे. प्रत्येक पदार्थ छान आहे, गुणी आहे फक्त त्याचा युक्तीने अर्थात हुशारीने उपयोग करणे महत्वाचे आहे. ज्यांचा अग्नी उत्तम आहे त्यांनी जरूर खावी , हिवाळ्यात जरूर खावी. परंतु वातावरणात उष्णता वाढत असतांना. पचायला जड होत असतांना, ज्यांना IBS, पोटात गुब्बारा धरणे, संधीवात, मूळव्याध, अन्न पचनाच्या तक्रारी , वारंवार पित्ताचा त्रास होत असेल, वृद्ध व्यक्ती, गर्भिणी अशा व्यक्ती एक छोटासा बदल करू शकतात. तो म्हणजे हरभरा ऐवजी मूग डाळीचे पुरण करावे.
साहित्य आणि कृती :
साहित्य :
२ कप मूग डाळ
गूळ २ कप/ साखर १ कप, गूळ १ कप
पाणी साधारण ३-४ कप
कणिक १ कप
चवीपुरते मीठ
पाणी आवश्यकतेनुसार
कृती :
सर्वप्रथम कणिक मळून घ्यावी, नेहमीपेक्षा सैलसर असावी जेणेकरून पुरणपोळी छान होते. पण मैदा घेणे टाळावे कारण त्यामुळे पोळी पचण्यास अधिक जड होते. साधी कणिक सैलसर भिजवली तरी पोळ्या उत्तम होतात.
कणिक व्यवस्थित मळून, तेल लाऊन बाजूला ठेवून द्यावी. तेलामुळे चिकटपणा कमी होतो
डाळ घेऊन त्यामध्ये डाळल बुडेल व पाणी १/२ इंच वर येईल इतके घ्यावे.
डाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी.
त्यानंतर शिजलेली डाळ चाळणीवर ठेऊन व्यवस्थित जास्तीचे पाणी काढून घ्यावे.
डाळीमध्ये गूळ/गूळ आणि साखर (एकत्रित आवडत असल्यास ) मिसळून शिजवून घ्यावे ,पुरण नीट शिजले की नाही याची परीक्षा म्हणजे चमचा शिजलेल्या पुरणामध्ये उभा राहतो. आता ही डाळ पुरण यंत्रात किंवा पुरणाच्या चाळणीने वाटून घ्यावी.
यामध्ये विलायची पूड, जायफळ असे १/२ चमचा घालावे. यामुळे पुरण पोळीला सुगंध, चव, तर येईलच परंतु पचनास देखील मदत होईल
कणकेच्या पारीमध्ये पुरण भरून पुरण व्यवस्थित लाटून घ्यावी
तूपावर खरपूस भाजावी.
तूपाचा रोल पण खूप महत्वाचा आहे बरं का, तूपामुळे चव वाढते, पचनास मदत होते, पित्त कमी होते शिवाय डाळींमध्ये असलेली रुक्षता देखील कमी होते.
मूग डाळ पचायला हलकी , थंड आहे, रुक्ष आहे.
अशाप्रकारे पुरणपोळी केल्यास सणवार आनंदी व आरोग्यदायी होऊ शकतात.
तरीदेखील पुरणा बरोबर च इतरही अनेक पदार्थ असतात म्हणून जेवणाआधी लंघन करावे. किंवा शक्कय नसेल तर हलका नाश्ता घ्यावा , पोटभर खा, मनमुराद आनंद लुटा एकदा खाल्ल्यानंतर विसरून जा, खंत करू नका पोटाला त्याचे काम निवांत करू द्या. शेवटी सणवार हे आनंद देण्यासाठीच साजरे केले जातात. नैवेद्य देव खात नाही पण त्यामागची भावना बदलली की अन्नाची चवही बदलते.
P.C. Internet
वैद्य सौ रेवती गर्गे
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक,जळगाव.
8010454807
(पोस्ट लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही.)