Friday, July 10, 2020

अळू वडी ( Alu Vadi)

                       आला आला वारा....संगे पावसाच्या धारा.... असा छान आशाजींच्या आवाजात गण सुरुये आणि हातात चटपटीत, खमंग काहीतरी आहे आणि एकीकडे चहाचा कप आहे. आहा! क्या बात..! स्वर्गसुख च जणू....बाहेर छान थोड थंड हवा आभाळ अस वातावरण असता मधूनच पाऊस अस असतांना अनेक चटपटीत पदार्थ खुणावू लागतात. पण ग्रिष्मातले चटके सोसल्यावर आपला पोटातला अग्नी काही अजून खूप फुललेला नसतो. शरीरात पित्त साठत असते. पचनशक्ती थोडी कमजोर झालेली असते. वातदोष बळावलेला असतो. शिवाय दुषित पाणी वातावरणातील ओलसरपणा यामुळे बाहेरचे अन्न दुषित असते. त्यामुळे ते खाल्ल्याने पोट बिघडते.आणि आता तर  बाहेरचे खाण्याचा प्रश्नच  येेेत नाही. सध्या सगळंच घरीच करायचं आहे. म्हणून यावेळी १ अशीच माहित असलेली आणि  सर्वांना आवडणारी  अशी recipe बघूया.



                                   अळू वडी

अळू :

अळू चा कंद असतो. त्याचे अनेक प्रकार आहेत. त्याची हृदयाकृती पाने असतात. 

त्यापैकी वांगी आणि हिरव्या रंगाचे खाण्यासाठी उपयुक्त असतात. हे बहुवर्षायू असते.घराच्या परसबागेतही छान जगतो आणि दिसतोही सुरेख!

महाराष्ट्रात पूर्वीपासून लग्नामध्ये अळूचे फदफदे अर्थात् अळूची पातळ भाजी करण्याची पद्धत आहे.

चिंच आणि गुळ घालून चविष्ट भाजी होते.

साधारणत: भारतातल्या वेगवेगवेगळ्या सर्वच भागात अळूचे विविध व्यंजन आवडीने केली जातात. आणि त्याची वेगवेगळी नावे सुद्धा आहेत.

बिहार मध्ये "ऐरकांचन" असे सुंदर  नाव आहे !

तर उत्तर प्रदेशात "साहिना" नावाचा पदार्थ केला जातो. अळू वडी किंवा भजे असाच तो प्रकार असतो.

अळूचा कंद सुद्धा अतिशय पौष्टिक असतो.           

अळूचे पान काळ्या देठाचे घ्यावे. ते गुणांनी चांगले असते.

Calium oxalate crystals मुळे घसा खवखवण्याची शक्यता असते. म्हणून पदार्थ करताना त्यात चिंच घालावी म्हणजे घसा खवखवत नाही. 

 

साहित्य आणि कृती :
   

अळूची पाने

डाळीचे पीठ/मुगाचे पीठ ( मी मुगाचे पीठ घेतले आहे)  

तांदळाचे पीठ

मीठ व साखर/ गुळ चवीनुसार

जिरे पुड

हिंग

कडीपत्ता,

तिखट

हळद,

तीळ

ओवा

चिंचेचा कोळ


कृती :

१) अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. देठ काढून टाकावे. त्यावर लाटणे फिरवावे जेणेकरून पान सपाट होईल व त्यावर पीठ लावणे सोपे होईल.
२) एका भांड्यात डाळीचे पीठ व इतर सर्व साहित्य मिसळून भज्यांच्या पिठापेक्षा घट्ट होईल इतपत पाणी घालावे.

३) त्यानंतर सर्वात मोठे अळूचे पान घ्यावे. त्यावर पीठ लाऊन घ्यावे.त्यानंतर त्यावर दुसरे पान उलट ठेवावे. त्यावर  पुन्हा पीठ लाऊन घ्यावे. याप्रमाणे ४-५ पाने लाऊन घ्यावीत.

४) त्यानंतर त्याची गुंडाळी करून टोकाच्या बाजूनेही पीठ लाऊन घ्यावे.

५) एका पातेल्यात पाणी उकळत ठेऊन त्यावर चाळणी ठेऊन त्यावर पानांची घडी ठेऊन दोन्ही बाजूनी वाफवून घेऊन थंड करून वड्या 
कापून घ्याव्यात.


६) 
नंतर वड्या लोखंडी तव्यावर किंवा लोखंडी कढईमध्ये तेलावर परतवून घ्याव्यात.

 

गुण :

 अळू : 

शरीरास बल देणारा आहे, स्निग्ध असल्याने शरीरास स्निग्धता पुरवते. पचण्यास काहीसा जड, आहे हृदयातील अतिरिक्त कफ कमी करणारा आहे, तेलात तळलेले अत्यंत रुचकर आहे, गुणाने थंड आहे, जठराग्नी प्रदीप्त करणार आहे.यामध्ये विटामिन एबी 1,विटामिन सीतसेच फॉस्फरस असते, कॅल्शीअम, लोह असते. कंदामध्ये    विटामिन अ , ब१, सी असते. carbohadrates, proteins असतात. इतर स्टार्च असणार्या पदार्थांपेक्षा      

लवकर पचते. बटाट्यापेक्षा १.५ पट अधिक पौष्टिक आहे. लहान मुलांसाठी देखील उपयुक्त , शक्ती देणारा असा आहे.

हरभरा डाळ पीठ 

वातकारक, रुक्ष असते.     

मुगाचे पीठ :   

काहीसे वात वाढवणारे परंतु शितल आणि बळ देणारे आहे.

तीळ : 

बल देणारी आहे जाठराग्नी वाढवणारी आहे वातशामक आहे . आणि उष्ण आहेतम्हणून तीळ    उन्हाळ्यात खाऊ नये. तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हरकत नसते परंतु प्रमाण योग्य असावे.

कडीपत्ता : 

अग्निदीपन करणारापाचक आणि आहे  पोषक असतो

धणेपूड : 

जाठराग्नी प्रदीप्त करणारी  पचनशक्ती वाढवणारी आहे.

जिरेपूड :

भूक वाढवते, पचन सुधारते. वाताचे अनुलोमन करते म्हणजे वाताला अधो मार्गास प्रवृत्त करते. जेणेकरून पोट साफ होण्यास मदत होते. 

असे सर्व पदार्थ एकत्रितरित्या एकमेकांच्या गुण दोषांना सांभाळून घेतात. अळू पचायला काहीसा जड असला तरी ओवा, जिरेपूड ,कडीपत्ता पचनासाठी मदत करतात. तीळ व तेल यांमुळे डाळीची रुक्षता कमी होण्यास मदत होते. धणे पित्ताला नियंत्रित करतात. असा सर्व विचार आपल्या पारंपरिक पदार्थांमागे दडलेला असतो. आणि त्याचीच आपल्या शरीराला सवय असते. म्हणून पारंपरिक पदार्थांना प्राधान्य द्या आणि निरोगी रहा!

Ayurvedcooking #Ayurvedrecipes #TreasureofAyurved #Healthydiet #Healthyeating

#Healthylifestyle #Cookathome #StayHomeStaySafeStayHealthy

 

वैद्य रेवती गर्गे

त्रिदल आयुर्वेद क्लिनिक, पंचकर्म सेंटर, जळगाव.

( लेख नावासह शेअर करण्यास हरकत नाही.)

 

1 comment:

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...