Saturday, July 25, 2020

गव्हाची खीर




आषाढ अमावस्येनंतर ऊन सावलीचा खेळ सुरू होतो. त्यानंतर श्रावणाला सुरुवात होते आणि सणावारांची  रांगच लागते. त्यापैकीच आज नागपंचमी. 

कृष्ण आणि अर्जुनाने नवीन राजधानी निर्माण करण्यासाठी खांडववन जाळले. त्यामध्ये अनेक नाग मारले गेले आणि म्हणून नागराज तक्षकला  अर्जुनाचा सूड घ्यायचा होता. 

या उद्देशाने त्याच्या वंशातील परीक्षित राजा ला तक्षकाने मारले. यावर संतप्त होऊन परीक्षित राजा च्या मुलाने म्हणजे जनमेजयाने सर्पसत्र सुरु केले, यज्ञामध्ये सापांची आहुती देण्यास सुरुवात केली. तेव्हा आस्तिकाने मध्यस्थी करून ते थांबवले.

म्हणून नागाच्या प्रजातींचा वंश वाचला. आणि तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी. 
तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते. 

याशिवाय लोकोत्तर प्रचलित नागीण आणि तिच्या पिल्लांची कथा आपल्या सर्वांनाच माहीत आहे. 
म्हणून आज काही कापू, भाजू नये, लोखंड वापरू नये अशी मान्यता आहे. 

याशिवाय सापाचे विशेष महत्व शेतात असते. आणि जो आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मदत करतो त्याच्याप्रति कृतज्ञता असावी ही आपली संस्कृती आहे.
तर अशी नाग पंचमी ची वैशिष्ट्ये आहेत.

नागपंचमी भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान याठिकाणी साजरी केली जाते.
नेपाळ मध्ये नागपंचमीचे विशेष महत्व आहे.

आजच्या दिवशी अनेक ठिकाणी पुरणाची दिंडी, उंडे, गव्हाची खीर, कान्हवले, कोकणात हळदीच्या पानातील पातोळ्या करण्याची पद्धत आहे. 

माझ्या माहेरी आणि सासरी नागपंचमी गव्हाची खीर करण्याची पद्धत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही खीर अत्यंत लाभदायक आहे . म्हणून आज आपण गव्हाची खीर कशी करायची आणि गुणधर्म काय आहेत ते बघूया.


गव्हाची खीर :

पूर्वतयारी :

गहू धुऊन वाळवून घ्यावे व नंतर जाडसर दळून घ्यावे. मिक्सर ला सुद्धा व्यवस्थित होते.



साहित्य :

दळलेले गहू 1 वाटी
गूळ 1/2 वाटी (साखरेऐवजी पूर्ण गूळ सुद्धा घालता येऊ शकतो)
साखर1/2 वाटी
विलायची पूड पण चमचा
जायफळ 1 चिमूटभर/ दुधात उगाळून
खोबऱ्याचे काप किंवा किस 
दूध ( आम्ही वैद्य लोक देशी गायीचे दूध सांगतो)



कृती :

1. गहू  साधारण 2 ते 2.5 वाटी पाणी घालून कुकर मध्ये 3-4 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावे.

2. त्यानंतर भांड्यामध्ये गरम असतानाच गूळ आणि साखर घालून उकळून घ्यावे.




3. त्यानंतर त्यामध्ये विलायची पूड, जायफळ, ड्राय फ्रूट्स घालवे.

4. आयत्या वेळी कोमट दुध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.




गुण :

गव्हाची खीर अतिशय पौष्टीक आहे. लहान मुले, कृश व्यक्ती, गर्भवती महिला, वृद्ध अशा लोकांना ज्यांना शरीराचे पोषण अपेक्षित आहे अशा वेळी उत्तम आहे.

श्रावणात अनेक उपवास असतात म्हणून सुरुवातीला शरीराला एनर्जी चा साठा आपण पुरवू शकतो.

याशिवाय या ऋतू मध्ये वात वाढलेला असतो, पित्त साठण्यास सुरुवात झालेली असते म्हणून षड्रसांपैकी मधुर, अम्ल , लवण म्हणजेच गोड, आंबट, खारट हे रस शरीराला आवश्यक असतात .अर्थात् प्रमाणातच. यामुळे वाताचे शमन होते. 

हाडांचेही पोषणही चांगले होते.

विलायची , जायफळ ही प्रक्षेप द्रव्ये असतात ती पदार्थाची चव, सुगंध वाढवतात याशिवाय ते पदार्थ पचण्यास सुद्धा मदत करतात.
गव्हाची खीर पचण्यास थोडी जड असते यासाठी ज्यांना पचनास विलंब होत असेल त्यांनी यामध्ये किंचित सुंठ पावडर, लवंग किंवा मिरेपूड घालून खावी.

आज अनेकांच्या घरी गव्हाची खीर असेलच आणि नसेल तर ती या ऋतूत आवर्जून करून खा.

#traditionalsweet #shravan&health #healthytasty #cookathome #stayhomestaysafestayhealthy

3 comments:

  1. Chan pakkruti . Amravati kade Narayan Dashmi cha san pitru pakshat dashami la kartat tyaveli pan ashi kheer keli jate . Mazya maheri amhi nehmi karit hoto .

    ReplyDelete
  2. अरे वा! छान नवीन माहिती मिळाली..धन्यवाद!

    ReplyDelete
  3. Mast ekdam...me keli aaj kheer...thank u

    ReplyDelete

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...